Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून हैदराबाद ते अजमेर दरम्यान विशेष एक्सप्रेस रेल्वेगाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ही गाडी महाराष्ट्रातून धावणार आहे. विशेष म्हणजे या गाडीला राज्यातील तब्बल आठ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
अजमेर शरीफ येथील जगप्रसिद्ध उरूसच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रातूनही नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला परिसरातून मोठ्या संख्येने भाविक अजमेरला जातात. ही गर्दी लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासनाने हैदराबाद–अजमेर विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरूससाठी जाणाऱ्या भाविकांना आता थेट आणि सोयीस्कर रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
फक्त भाविकच नव्हे तर राजस्थानमधील उज्जैन, चित्तोडगडसारख्या पर्यटनस्थळांना जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही विशेष गाडी फायदेशीर ठरणार आहे. जर तुमचाही राजस्थान ट्रिपचा प्लॅन असेल, तर ही गाडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. Maharashtra Railway News
वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर, ही विशेष गाडी 23 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद येथून सकाळी 11.30 वाजता रवाना होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातून प्रवास करत ही गाडी गुरुवारी पहाटे अजमेर येथे पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून सकाळी अजमेरला पोहोचता येणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी, हीच विशेष गाडी शनिवारी म्हणजेच 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी अजमेर येथून सुटणार असून सोमवारी सकाळी हैदराबाद येथे पोहोचणार आहे. त्यामुळे उरूस किंवा पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांना आरामात परतीचा प्रवास करता येणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेसला मार्गावरील एकूण 18 रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम आणि चित्तोडगड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.
विशेषतः नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम आणि अकोला परिसरातील प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी मोठा दिलासा ठरणार असून, थेट अजमेरपर्यंत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळे या विशेष गाडीच्या निर्णयाचं प्रवाशांकडून स्वागत केलं जात आहे.
हे पण वाचा | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! या शहराला नवीन वंदे भारती एक्सप्रेस मिळणार!